अबोल शेवट..

 

प्रेम म्हणजे काय? हे कळत नव्हतं तेव्हाच त्याला तिच्याबद्दल मनात भावना जाग्या झाल्या होत्या,पण त्याला ह्याची जाणीव होण्याआधी आणि ते प्रेम व्यक्त करण्याआधीच असं काही होईल हे त्याला वाटल नव्हतं..




 

अबोल शेवट..

                    मनात नुकत्याच उमलणाऱ्या भावनांना हळू हळू अजूनच पाझर फुटत होता. वयात येताना होणारे ते बदल आदित्यला आता प्रकर्षाने जाणवू लागले होते. मुलींकडे पाहताना आता एक वेगळीच भावना त्याला वाटू लागली होती. त्यातही अनुला पाहिल्यावर त्या अजूनच उफाळून येत होत्या,पण हिंमत नव्हती म्हणून ती समोर असली तरी तो काही न बोलताच आपला रस्ता बदलून घ्यायचा. असेच आता दिवसामागून दिवस जात होते,पण गेल्या काही दिवसात त्याचं आता अनुशी बोलणं व्हायचं. अर्थात, बोलायची सुरुवात तिनेच केली होती. दहावीच वर्ष असल्याने आता सुट्टी सुरू झाली होती आणि परिक्षाही अवघ्या महिन्यावर येऊन पोहोचली होती, सुट्टीमुळे आता आदित्यला अनुला साधं पाहताही येत नव्हतं.. त्याला सतत तिची आठवण येत होती, कितीतरी वेळ तो तिच्या आठवणीत हरवून जात होता, तिचा तो निरागस चेहरा,तिचं हसू,तिचा मनमिळावू स्वभावाच्याच तर तो खरं प्रेमात होता, पण आता त्याच हे  प्रेम त्याच्या मनातच घर करून राहिलं होत. त्यातच  हळू हळू आदित्य अभ्यासात मग्न होऊन गेला आणि पाहता पाहता त्याचं बारावीच वर्ष देखील उलटून गेल. त्याने आता पुढच्या शिक्षणांसाठी नवीन कॉलेजला प्रवेश घेतला होता. एक नवीन वळण त्याच्या आयुष्यात आता आल्याने तो एकदम खुश होता.  पण इकडे अनुला मात्र आता पुढे शिकता येणार नव्हतं,तिचं शिक्षण आता बारावीनंतर पूर्णपणे थांबलं होत. ह्याला कारण तिच्या घरी असणार जुन्या विचारांचं जग कारणीभूत होत, मुलीने फक्त चूल आणि मूल हेच सांभाळाव अश्या विचारांची माणसं होती तिच्या घरात..कितीतरी वेळा अनुला कॉलेजला जायला नाही म्हटल्या जायचं पण कसं तरी तिने बारावीपर्यंत घरचा ओरडा खात शिक्षण केलं होत.आणि हयानंतर बंद शिक्षण अशी सक्त ताकीद तिला आता दिली होती. पण अनुला मात्र पूढे अजून शिकण्याची इच्छा होती,आणि  तिची ही इच्छा आता फक्त इच्छाच राहिली होती.. म्हणून ती मनातून खूप दुखी होऊन गेलेली.  ह्या सगळ्यात भरीसभर म्हणून आता तिच्या घरच्यांनी तिला घेऊन गावाकडे जाण्याचं ठरवलं होतं, लग्नाचं वय झालं चार गोष्टी शिकवायला हव्यात म्हणून तिला घरच्यांनी आता गावी नेलं होत. आणि इकडे आता आदित्य नवीन कॉलेजला पोहोचला होता, पाहिला दिवस म्हणून तो खूप खुश होता, नवी जागा, नवे मित्र,आपली स्वप्न हे सगळं घेऊन तो एका नवीन वाटेवर जायला तयार होता,पण त्याची ही नवी वाट त्याला कुठे घेऊन जाणार होती हे त्यालाच माहीत नव्हत..! , उत्साहात असतानाच तो कधी कॉलेजला पोहोचला त्याला कळलच नाही, कॉलेजला पोहोचल्यावर समोरच त्याला मुलींचा घोळका दिसला,त्यातल्या एका मुलीकडे बघून त्याला आज दोन वर्षांनी अनुची आठवण झाली..!तिच अनु जिच्यावर तो आजही तितकंच प्रेम करत होता, दहावीच्या परीक्षेनंतर त्यांचं एकदाही भेटणं, बोलणं झालं नव्हतं.. आणि अभ्यासात जणू त्याच्या बुद्धीने अनुला पूर्णपणे त्याच्या आठवणीतून मिटवल होत.. पण आज; त्याच्या मनात तिची असणारी सुंदर प्रतिमा त्याच्या डोळ्यासमोर आली होती, आज पुन्हा त्याला अनुची आठवण झाली होती..! तिच्या आठवणीने त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न चालू झाले; ती कुठे असेल आता..?,कोणत्या कॉलेजला असेल..?,काय करत असेल..? ह्या सगळ्या प्रश्नात असतानाच लेक्चरची बेल त्याच्या कानावर पडली, बेल ऐकून  तो वर्गात जाऊन बसला.. दिवसभर लेक्चर करताना त्याला अनुची आठवण येत होती..

          संध्याकाळी घरी आल्यावर त्याने पहिले त्याच्या शाळेतल्या दोन-तीन मित्रांना कॉल लावला, आणि अनुबद्दल चौकशी करायला सुरुवात केली.. पण त्यातल्या कोणाकडेच तिचा ना पत्ता होता, ना नंबर होता.. मग त्याला अनुच्या जिवलग मैत्रिणीची म्हणजे निशाची आठवण झाली, पण ती शहर सोडून केव्हाच गेली होती हे त्याला लगेच लक्षात आलं..  निराशाजनक चेहरा करून आदित्य तसाच अनुच्या आठवणीत झोपी गेला..

          सकाळी उठल्यावर त्याला मित्राचा कॉल आला की,तू लवकर कॉलेजला ये.. आदित्य आवरून कॉलेजला गेला.. हळू हळू नवीन वातावरणात तो रमायला लागला..  लेक्चर,मजा मस्ती करत कधी त्याचं कॉलेजच शेवटच वर्ष आलं हे त्याला कळलच नाही.. पण ह्या सगळयात त्याला सतत एकच गोष्ट त्रास देत होती की, ‘आपण एकदा तरी अनुला भेटलं पाहिजे,निदान तिला आपल्या मनातलं सांगितलं तरी पाहिजे मग तिचा निर्णय काही असला तरी मला तो मान्य असेल..’हेच विचार त्याच्या मनात कायम येत असायचे. आणि असच एकदा कॉलेज संपल्यावर घरी जाताना आदित्यने त्याची गाडी अचानक अनुच्या जिवलग मैत्रिणीच्या म्हणजेच, निशाच्या जुन्या घराकडे वळवली. तिथे पोहोचल्यावर तिच्या घराजवळच्या एका घरात जाऊन त्याने चौकशी केली की, निशाचा नवीन पत्ता किंवा नंबर आहे का..? अचानक त्याला आज निशाकडून अनुची काहीतरी माहिती मिळेल हे डोक्यात आलं होत. म्हणून तो तिचा नवीन पत्ता त्यांना मागत होता. आणि नशिबाने त्याला तिचा नंबर भेटला त्या घरातून. तो नंबर मिळताच आदित्यने निशाला कॉल लावला,पण त्याच्या मनात भीती होती,अनुची माहिती भेटेल की नाही ह्याची..  तितक्यात  समोरून आवाज आला; हॅलो,कोण बोलतंय..? आदित्यने त्याची ओळख पटवून दिली आणि थेट तिला प्रश्न केला की, अग तू अनुच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेस का..?

निशाने त्याला तिचं अर्धवट शिक्षण आणि तिचं गावाकडे निघून जाणं हे सगळं सांगितलं, हे ऐकून आदित्य विचारात पडला की, अनुसारख्या हुशार मुलीला कस काय शिकू दिलं नाही..?आणि तिने विरोध करूनही त्यांनी काहीच कसं ऐकलं नाही..? त्याच्या विचारातून त्याला जागी करत निशा म्हणाली, माझ्याकडे तिचा नंबर आणि पत्ता आहे,पण तिचा नंबर वर्षभरापासून बंद लागत आहे.. आदित्यने अनुचा नंबर आणि पत्ता निशाकडून घेतला आणि तो त्याच्या घराच्या रस्त्याकडे निघाला..

रात्री त्याने अनुच्या नंबरवर कॉल केला पण निशा म्हणाली, त्याप्रमाणे तो नंबर बंद होता. आदित्यला आता अजूनच अस्वस्थ वाटत होतं,त्याला आता कसंही करून अनुला भेटायचं होत.. ती कशी असेल..?,काय करत असेल..?,बरी असेल का..?,तिला काही त्रास तर नसेल ना..? असे किती तरी प्रश्न त्याच्या मनात येत होते, अखेर त्याने ठरवलं की, आता काही करून ह्या पत्यावर जायचं आणि अनुला भेटायचं.! तिचे घरचे बोलतील, नाही म्हणतील तरी मी आता अनुला भेटणार बस...! आणि तिला भेटून मी; ‘तिला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे..’ हे सांगून तिचा होकार- नकार जे असेल ते ऐकून घेणार, हेच त्याच्या मनात चालू होतं.. आणि दुसऱ्याच दिवशी तो निघाला; त्याच्या अनुला भेटायला.. , एकदम प्रसन्न, आनंदात तो अनुला भेटायला निघाला होता तिच्या गावाकडे. वाटेत त्याने मस्त तिला आवडणारी गुलाबाची छान फुल घेतली आणि तिच्यासोबतच्या शाळेतल्या प्रत्येक आठवणींत तो रमून प्रवासाचा मस्त आंनद घेत गाडी चालवू लागला.. त्याच्या चेहऱ्यावर अनुला पाहण्याची उत्सुकता ओसंडून वाहत होती.

आदित्य अनुच्या आठवणींत रमलेला असताना अनुचं गाव आलं, जसं जसं तिचं घर जवळ येत होतं तस तस त्याच्या मनाची घालमेल वाढत होती,मनातच त्याने अनुचं एक सुंदर अस रूप तयार केलं होतं, तिला भेटल्यावर काय आणि कसं बोलायचं हे सगळं तो ठरवत होता.. ह्या विचारातच तिच्या घराजवळ जाऊन तो पोहोचला,घराचं दार वाजवताना त्याच्या हृदयाचे ठोके चुकल्यासारखे त्याला वाटत होते, दार वाजवल्यावर समोर एका स्त्रीने म्हणजे अनुच्या आईने दरवाजा उघडला आणि कोण पाहिजे विचारलं, आदित्यने पटकन अनु आहे का..? मी तिचा बालपणीचा मित्र..सहज आलो तिला भेटायला..  हे ऐकताच; निघा इथून.. असं ओरडून म्हणत, तिच्या आईने दरवाजा जोरात बंद करून घेतला.. आदित्यला काहीच कळत नव्हतं, तिच्या आईच हे वागणं त्याला कोडयात पाडणार होत, पण प्रयत्न करूनही कोणीच दरवाजा उघडायला तयार नव्हत. अखेर नाईलाजाने आदित्य बाहेर आला, समोर त्याला एक घर दिसत होतं,मनात तर खूप वाटत होत त्याच्या, जावं त्या घरात आणि विचारावं पण पुन्हा निराशाच पदरी पडली तर, म्हणून तो तसाच तिथे उभा होता अनुच्या घराकडे पाहत, ह्याच आशेत की ,अनु जर बाहेर आली तर ती मला दिसेल..

       पण बराच वेळ होऊनही कोणी दार उघडले नव्हते आणि अनुसुद्धा त्याला दिसली नव्हती..    तितक्यात समोरून एक मुलगी येताना दिसली, तिला पाहून आदित्यला वाटलं हीच अनु असावी..  पण जस जस ती जवळ येत होती तस त्याला कळलं की,ही अनु नसून दुसरीच मुलगी आहे.. तिने आदित्यला पाहिलं आणि आदित्य ज्या घरासमोर उभा होता त्या घरात ती निघून गेली.. इकडे आदित्यला नेमकं काय करावं आता हेच सुचत नव्हतं, अनुच्या घरासमोर असूनही तिला भेटता येत नाहीये ह्याची त्याला खंत वाटत होती.. पाहता पाहता आता संध्याकाळ व्हायला आली होती, अनुच्या घरातून अजून कोणीच बाहेर आलेलं नव्हतं..

तेवढ्यात समोरच्या घरातून आदित्यला आवाज ऐकू आला, त्याने वळून पाहिलं तर; ती त्या घरात गेलेली मुलगी त्याला आवाज देत होती, तिच्याकडे पाहतच आदित्य त्या घराच्या दाराजवळ गेला, त्याला आत यायला सांगून त्या मुलीने तिच्या आईला बोलवून आणलं.. पाणी देत तिच्या आईने आदित्यला विचारलं कोण आहेस तू..?, आणि सकाळपासून नेमकं कोणाची वाट बघत आहेस..? आदित्यने लगेच त्यांना सगळं काही सांगितलं..   डोळ्यातलं पाणी सांभाळत; ‘मी इथे फक्त अनुला भेटायला आलोय’ इतकं बोलून तो थांबला.. त्याचे इथे येण्याचे कारण ऐकून त्या मुलीच्या आणि तिच्या आईच्या डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली, डोळयांतल पाणी पुसत त्यामुलीने आतमध्ये जाऊन एक डायरी आणली. आणि आदित्यच्या हातात देत म्हणाली, ही डायरी अनुची आहे..  माझ्याकडे देऊन गेलीये ती ही डायरी.. तू वाच ही डायरी.., त्यानंतर अनुला भेट..  ह्यात तुला तुझ्या अनुची काही मनातली गुपित भेटतील..

आदित्यच्या हातात असणारी ती डायरी त्याने उघडली, आणि पहिल्या पानावर त्याला; “फक्त तुझ्यासाठी”..! हे शब्द दिसले, त्याने पुढंच पान वाचायला सुरुवात केली, त्यात त्याला त्याच्या शाळेतला नववीचा पहिला दिवसाबद्दल लिहिलेलं दिसल, एक एक पान वाचताना त्याला आपण आपलीच मागची काही वर्ष पुन्हा जगत असल्याचा भास झाला.. अनुच्या त्या डायरीत फक्त आणि फक्त आदित्यबद्दल लिहिलेलं होत, अगदी सुरुवातीपासून ते त्यांची कधीच भेट झाली नाही हे सगळं तिने त्यात लिहिलं होत, आणि त्याचबरोबर तिच आदित्यवर किती जिवापाड प्रेम आहे हे तिने त्यात प्रत्येक पानात लिहिलं होत,पण तिची कधीच त्याला हे सांगण्याची हिंमत झाली नाही. घरच्यामुळे तिने हे कधी त्याला सांगितलेच नाही, घरी कळालं आणि तिच्या  घरच्यानी तिला दहावीची परीक्षाच देऊ दिली नाही तर ह्या भीतीपोटी तिने त्याला कधी हे सांगितलच नव्हतं. अनुची ती डायरी वाचून आदित्यच्या डोळ्यातले अश्रु थांबतच नव्हते. स्व:ताला सावरत तो त्या मुलीला; ‘अनु कुठे आहे मला प्लीज सांगा..’ अस म्हणू लागला. ती मुलगी तिचे अश्रु पुसत आदित्यला बोलू लागली, ‘ही डायरी अनुने माझ्याकडे दिली होती’, हयात तुझ्याबद्दल लिहिलेलं आहे हे तिने मला आधीच सांगितलं होत, आणि  तिची आठवण म्हणून मी ही डायरी जपून ठेवली आहे.. माझी जिवलग मैत्रीण झाली होती अनु.. कायम माझ्या सोबत असायची ती, पण  ‘मागच्या वर्षाच्या सुरुवातीलाच अनुच लग्न झालं..’; हे वाक्य ऐकताच, ‘आदित्यच्या पायाघालची जमीनच सरकली’ , पुढे ती मुलगी बोलू लागली, अनुला खरं तर हे लग्न करायच नव्हतं; पण तिच्या वडीलांनी तिच काहीच ऐकलं नाही, आणि तिचं लग्न लावून दिलं, जाताना अनुने मला ही डायरी कायम जपून ठेव इतकं सांगून निघून गेली,पण हे सांगताना तिच्या मनाला किती यातना झाल्या हे फक्त तिलाच माहीत.., खूप प्रेम करत होती ती आदित्य तुझ्यावर..!

 ज्या मुलाशी अनुच लग्न झालं तो मुलगा तिला खूप छळत होता, सतत पैसे घेऊन ये तुझ्या घरून.., इथे राहू नको.., वाटेल ते बोलायचा तो तिला.. पण अनुने कधीच कोणाला हयाविषयी सांगितलं नाही, त्याचा मार, त्याच छळणं सगळं काही अनु मुकाट्याने सहन करत राहिली..  त्याला फक्त अनुच शरीर हवं असायचं तेवढं मिळालं की, अनुला साधं पाहतही नसायचा तो..

आणि एक दिवस अनुला मारताना तिच्या नवऱ्याने तिला जोरात भिंतीला आपटले; अनु जोरात घाली पडली, तिच्या डोक्यातून रक्ताच्या वाहणाऱ्या धारेकडे त्याने लक्ष न देता; तिला तसंच सोडून तो निघून गेला. आणि थेट  अनुच्या घरी येऊन त्याने तिच्या आई-वडिलांना, ‘तुमची मुलगी नीट राहत नाही’..,’कुठल्याचं गोष्टीच वळण नाहीये तिला’.. , ‘तिचे लक्षणं चांगली नाहीत’.., तिला घेऊन जा..,  नाहीतर स्वतःच मरून टाका.. असे बोलून निघून गेला.. इकडे अनुच्या घरच्याना अनुचा प्रचंड राग आला होता, तिच्या वडीलानी तर मुलीने चांगलीच इज्जत काढली असं बोलून त्यांनी कायमसाठी अनुला मेली ती आपल्यासाठी असं बोलून टाकल होत.. तिचं नाव घ्यायचं नाही ह्या घरात असं सांगून दिलं.. आणि तिचा विषय हयानंतर ह्या घरात अजिबात काढायचा नाही असं सगळ्याना बजावून सांगितलं होत..

आता आदित्यला सगळ्या गोष्टी कळू लागल्या होत्या, म्हणून सकाळी तिच्या आईने दरवाजा असा लावून घेतला.., पण त्याच्या मनात तरी हा प्रश्न होताच की मग अनु नेमकी आता कुठे आहे..?, त्याने त्या मुलीला विचारायच्या आत त्या मुलीने त्याचा हात धरून एका फोटो जवळ त्याला नेलं आणि सांगितलं, ही तुझी अनु..! ‘आता नाहीये ती ह्या जगात..’ ज्यादिवशी तिच्या डोक्याला लागलं होत, त्याचं वेळी ती हे जग सोडून गेली होती.. तिच्याकडे न पाहता तिचा नवरा तेव्हा तिथून निघून गेला होता.., अनु कायमची आपल्याला सोडून गेली त्याच दिवशी..  तिच्या नवऱ्याने अनुच्या घरी ही बातमी पोहोचवली पण तिच्या घरून कोणीच तिला शेवटच बघायला सुद्धा गेलं नाही.. आदित्यच्या कानावर हे शब्द पडताच, त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या  धारा वाहू लागल्या.. ‘जिच्यासाठी त्याने एवढी वाट पहिली होती, आयुष्यभर जिच्यावर एवढं प्रेम केलं आज ती नाही हे त्याला सहनच होत नव्हतं..’ त्याला हे पटतच  नव्हत की अनु नाही.. तो पुन्हा पुन्हा त्या मुलीला म्हणत होता, खरं सांग; खरं सांग, ‘अनु मला सोडून नाही जाणार.. मला तिला एकदा भेटायच  आहे..!  बोलत बोलत तो आता फक्त रडत होता..  

आज त्याला अनु भेटली होती.. पण ना ती दिसत होती, ना ती बोलत होती.. आदित्य आज पूर्ण खचून गेला होता; जिच्यासाठी तो इथंवर पोहोचला होता ती आज ह्या जगात नाही हे त्याला खरंच वाटत नव्हतं, ती डायरी आणि त्यात असलेला अनुचा फोटो घेऊन तो त्या घरातून निघून गेला.. त्या घरातून निघून बाहेर आल्यावर त्याने त्याची गाडी चालू केली आणि तो परतीच्या वाटेला लागला.. थोडं पुढे आल्यावर त्याने गाडी थांबवली आणि जिवाच्या आकांताने तो रडू लागला..! त्याच्या समोर ‘अनुच्या आठवणी आज होत्या, पण तिथे अनु नव्हती.., तिचही त्याच्यावर तेवढच प्रेम होत हेही त्याला आज कळालं होत, पण ते प्रेम तिच्या डोळ्यात पाहण्यासाठी तिथे आज अनु नव्हती..’

पुढचा आयुष्यभराचा आदित्यचा प्रवास आता फक्त आणि फक्त अनुच्या आठवणीत जाणार होता,तिच्या डायरीच्या सोबतीने तो आता त्याचं आयुष्य जगणार होता. पण त्याच्या जगण्यात आता तो पूर्णपणे अबोल होऊन आयुष्य जगू लागला होता. फक्त अनुच्या आठवणीच त्याला आता बोलत करत होत्या.

                    ह्या कथेतून मला हेच सांगायचं आहे की, एखाद्यावर प्रेम केल्यावर त्याला वेळेत ते सांगणं किती गरजेच आहे.  कारण, प्रेम मनात ठेवत गेल्याने साध्य काहीच होत नाही. उलट आयुष्यभर एकदा तरी आपण बोलायला हवं होत,का बोललो नाही..? हे प्रश्न छळत राहतात.., आणि त्याचप्रमाणे एखाद्याने आपल्याला दिलेला त्रास हा सहन केल्याने तो कमी होत नाही उलट तितक्याच प्रकर्षाने तो वाढत जातो हे ही आपण समजून घेतलं पाहिजे.., आणि एखाद्याच्या सांगण्यावरून आपल्याच माणसाला दोषी ठरवणं हे कितपत योग्य आहे..? बोलणारा कोणता हेतु मनात ठेवून बोलत आहे ह्याची शहानिशा एकदातरी केलीच पाहिजे, नाही तर मग  रागात एखादा निर्णय घेऊन सत्य समोर आल्यावर दुख व्यक्त करण्यात काहीच अर्थ नाहीये..

 

-           मराठी लेखणी


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या