तिची
निवड..
नेहा घरात प्रत्येकाची लाडकी त्यामुळे
तिला हवी असणारी प्रत्येक गोष्ट तिचे आई-वडील तिला देत होते. हुशार,समजूदार,गुणी
मुलगी होती नेहा. अभ्यासात हुशार असल्यामुळे आणि परिस्थितीही चांगली असल्याने तिला
हवं तितकं शिकवण्याची तिच्या आई-वडलांची तयारी होती, शिवाय नेहालाही पुढे शिकायचं
होत,म्हणून तिने पदवीच शिक्षण घेण्यासाठी चांगल्या कॉलेजला प्रवेश घेतला.
सुरुवातीला सगळंच नवीन असल्याने थोडी घाबरलीच होती ती,पण जसं-जसं दिवस पुढे जात
होते तसं-तसं नेहा कॉलेजच्या त्या वातावरणात मस्त रुळायला लागली होती.
नवीन कॉलेज,नवीन मित्र-मैत्रिणी ह्या
सगळ्यात तिचं मन एकदम आनंदी व्हायचं. अभ्यास, कॉलेजचा धिंगाणा ह्या सगळ्यात तिचे
पहिले वर्ष सहज निघून गेले.असच आता पुढचे दोन वर्षं निघून गेले की,मनासारखा जॉब
करायचा असा विचार करत ती पुढच्या वर्षीच्या प्रवेशाला कॉलेजला पोहोचली. तिचं सगळ काम झाल्यावर कॉलेजच्या बाहेर निघणार तितक्यात समोरून
येणाऱ्या मुलाने तिला थांबवून विचारले, ‘मला लायब्ररी कुठे आहे सांगशील का
प्लीज..?’, त्याच्याकडे एकटक पाहत ‘ती तिथे समोर आहे..’ नेहाने त्याला लायब्ररीकडे हात दाखवत सांगितलं.
थॅंक्स.. म्हणून तो मुलगा लायब्ररीकडे निघून गेला तरी नेहा मात्र त्याला जाताना बघत उभीच होती.. तिला
असं पाहत तिची मैत्रीण साक्षी तिला म्हणाली, ‘नेहा आवडला असेल तो, तर मी नाव
विचारू का त्याला जाऊन..?’ नेहा आणि साक्षी हसतच तिथून निघाल्या..
दुसऱ्या दिवशी उशीर झाला म्हणून,
कॉलेजला येण्यासाठी नेहा जरा घाईतच घरून निघाली होती. कॉलेजला पोहोचल्यावर
तिने मोबाईलमध्ये पाहिल तर साक्षीचे दोन कॉल येऊन गेले होते म्हणून जरा गडबडीतच ती
वर्गात जायला पटापट चालत होती.
तितक्यात तिला मागून आवाज आला, ‘एक
मिनिट शूक.. शूक..’ मागे वळून पाहिलं तर कालचा तो लायब्ररीवाला मुलगा होता, त्याला
पाहून तिला साक्षीच कालच बोलणं आठवलं.. म्हणून ती हसतच, ‘हं.. बोलणं काय..?’ असं
त्याला म्हणाली. ‘तू केमिस्ट्रिच्या लेक्चरलाच जात आहेस ना..?’, त्याच्या ह्या
प्रश्नावर नेहाने हो.. असं उत्तर देत ते दोघही बोलत वर्गाकडे निघाले.. माझं नाव
शशांक.. त्याने स्वतःची ओळख करून देत हात पुढे केला; नेहानेही तिचं नाव सांगत हात
पुढे केला.. बोलत बोलत दोघेही वर्गात पोहोचले आणि नेहा साक्षीजवळ येऊन बसली, तिला
आणि शशांकला सोबत पाहून साक्षीने लगेच, ‘म्हणून उशीर झाला तर..!’असं म्हणत नेहाला
चिडवायला सुरुवात केली.साक्षीला शांत करत नेहाने शशांककडे पाहिलं आणि थोडं लाजत
पुस्तक उघडून ती बसली. लेक्चर,कॅंटीन,
लायब्ररी असं आता नेहा जिथे जात होती, तिथे शशांकही जाऊ लागला होता. हळू हळू
त्यांच्यात मैत्री वाढत होती आणि काही दिवसातच त्यांची ही मैत्री प्रेमात बदलून
गेली. आता तर नेहाला सकाळी कॉलेजला नेण्यापासून ते घरी सोडण्यापर्यंत सगळा वेळ
दोघे एकमेकांच्या सोबत घालवत होते. नेहा अगदी मनापासून शशांकवर प्रेम करत होती.
तिच्या काळजीतून, प्रेमातून, स्पर्शातून त्याच्यावरच तिचं प्रेम हे सगळ्यांना दिसत
होत. पण शशांकच तसं नव्हत, त्याला वाटलं तेव्हा तो तिच्यावर हक्क दाखवायचा, मनात
आलं तर चार शब्द प्रेमाने बोलायचा, दिवसभर सोबत असूनही तो पूर्णवेळ मोबाईलमध्ये
डोक घालून बसायचा.. पण नेहाला
ह्यापेक्षाही महत्वाचं वाटत होत ते त्याने तिच्यासोबत थांबणं.. म्हणून ती कधीच त्याला त्यावरून बोलत नव्हती.
बघता बघता दिवस असेच पुढे जात होते. पण तिच्या
मनात सतत हा प्रश्न असायचा की,शशांकच माझ्यावर प्रेम आहे तर तो असं का
वागतो..?,नीट बोलत नाही..?, फक्त सुरुवातीला दोन तीन दिवस नीट बोलला आणि त्यानंतर
त्याने आजपर्यंत एकदाही मला प्रेमाने विचारलं नाही, असं का..?, पण ह्या सगळ्यात
त्यांच्या नात्याला उद्या एक वर्ष पूर्ण
होणार म्हणून नेहा खूप खुश होती. तिने त्याच्यासाठी मस्त शर्ट घेतला होता. तो बघतच
तिला झोप लागली, सकाळी साक्षीच्या कॉलने जाग आल्यावर तिला वाटलं
शशांकचा कॉल असेल.., पण साक्षीचा कॉल होता, तिच्याशी बोलून नेहाने शशांकला कॉल
केला, पण त्याने कॉल उचला नाही.. म्हणून
तिने कॉलेजला गेल्यावरच त्याच्याशी बोलू असं ठरवलं. आणि ती तयारीला लागली.
कॉलेजला आज तिची तिच जाणार होती, कारण
शशांक येणार नव्हता तिला घ्यायला. सकाळी
त्याच्याशी बोलणं झाल नाही म्हणून नेहा जरा नाराजच होती. पण कॉलेजला पोहोचल्यावर
तिने शशांकला पाहिलं आणि तिची सगळी नाराजी दूर झाली.
त्याच्याजवळ जात तिने प्रेमाने त्याचा
हात पकडला.. तोच; ‘काय आहे तुझं आल्या आल्या नेहा..!’ असं म्हणत शशांकने तिला
बाजूला ढकललं.. त्याचं असं बाजूला ढकलणं पाहून तिथे असणारे सगळे मुलं- मुली
नेहाकडे बघायला लागले. नेहाने एकदा शशांककडे पाहिलं आणि ती तेथून निघून गेली..
थोड्यावेळाने तिने शशांकला कॉल केला, ‘ हॅलो शशांक.. कँटिनला येतोस का, मला
बोलायचं आहे तुझ्याशी आणि काहीतरी द्यायचं पण आहे..?’, पण शशांक केव्हाच घरी आलेला
होता, म्हणून त्याने नेहाला; ‘मी घरी आलोय उद्या बोलू’ असं म्हणत कॉल कट केला..
इकडे नेहाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, मनात असंख्य प्रश्न होते पण एकाचही उत्तर
तिच्याकडे नव्हतं..
हातात मोबाईल घेत तिने शशांकला एक मेसेज
टाकला, ‘आज एक वर्ष झालं आपलं नात सुरू होऊन..
पण ह्या एका वर्षात तू कधीच मला नीट बोलला नाही, ना कधी नीट प्रेमाने
वागलास.. शशांक तुला नको असेल तर आपण नको राहायला ह्या नात्यात.. माझी जास्त
अपेक्षा नाही तुझ्याकडून, पण निदान तू मला वेळ द्यावा
ही अपेक्षा करणंही चुकीच आहे का रे..?
हा मेसेज वाचून शशांक कॉल करेल असं नेहाला वाटलं होत. पण शशांकने फक्त,
‘ओके.. मग आपण आता कधीच नको भेटायला.. काळजी घे बाय..!’ असा मेसेज नेहाला टाकला.
नेहाचा हा मेसेज पाहून त्याने साधा कॉल
करून सुद्धा नेहाला विचारलं नव्हत की, नेमकं झालं तरी काय आहे..?, असं का म्हणत
आहे..? असं काहीच त्याने तिला विचारल
नव्हत आणि ह्याच गोष्टीचा नेहाला जास्त
त्रास होत होता. तिच्या मनाला हे मान्यच नव्हत की, शशांक अस लगेच तिला सोडून
देईल.. पण आज तसं झाल होत.. खरं तर शशांकला सुरुवातीला नेहाबदल फक्त आकर्षण वाटत
होत आणि जसं जसं ते कमी झाल तसं तसं त्याने नेहाशी बोलणं कमी केलेलं, ती काही
बोलली तरच तो फक्त तिच्याशी बोलत होता..
म्हणूनच तर त्याला आज नेहाच्या ह्या मेसेजचा
फार काही फरक पडला नव्हता.. आणि शशांकच आपल्यावर प्रेमच नाही हे नेहाला आज
कळलं होत.. आतून खूप खचली होती ती.. , पण तरी तिच्या चेहऱ्यावर समाधान होत;
जे काही झालं ते आजच झालं ह्याच.. कारण, अजून पुढे जाऊन जर ह्या गोष्टी
झाल्या असत्या तर ह्याचा त्रास तिलाच जास्त
झाला असता हे तिला चांगलच माहीत होत..
नेहा आता पूर्णपणे नव्या वाटेला लागली
होती, मागच सगळं विसरता येत नसलं तरी पुढे जाणं गरजेच आहे असा विचार करून तिने
स्वतःला सावरलं होत.
नेहा आता अभ्यासाला लागली होती, शेवटच
वर्ष असल्याने तिला आता अभ्यासात कसलीच
कमी पडू द्यायची नव्हती. नेहमीप्रमाणे नेहा कॉलेजला जात होती. पण आता, ना ती
शशांककडे पाहत होती, ना त्याच्याशी बोलत
होती. हे सगळं पाहून खरं तर शशांकला जरा वेगळ वाटत होत. काहीतरी चुकल्यासारखं आता त्याला वाटायला लागलं होत. ती नसली की, शशांकला
तिची आठवण यायला लागायची, आतल्या आत त्याला नेहाच असं वागणं त्रास देत होत पण
करणार तरी काय.. बोलायचं प्रयत्न केला
तरी, नेहा लक्ष देत नव्हती.. आणि चूक आपलीच आहे हे शशांकला आता कळलं होत.. पण नेहा
मात्र आता पूर्ण अभ्यासात मग्न झाली होती.. असच आता त्यांच्या परीक्षा चालू झाल्या
होत्या आणि बघता बघता आज त्यांचा शेवटचा पेपर येऊन ठेपला होता.
शशांक आज त्याची चूक सुधारणार होता, नेहाशी बोलून आज तो तिची
माफी मागणार होता पण शशांक नेहाच्याजवळ जाताच
नेहा तिथून निघून गेली.
साक्षी शशांकच्या समोर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, ‘आता पुन्हा तिच्या
आयुष्यात येण्याचा प्रयत्नही करू नकोस.., जगू दे तिला तिचं आयुष्य आता..!’ आणि
एवढं बोलून ती ही निघून गेली.. पण शशांक मात्र नेहाला जाताना बघत होता.. काहीच
करता येत नसल्याने हतबल होऊन तो नुसता तिला जाताना बघत उभा होता..
नेहा आज जरा लवकरच ऑफिसला पोहोचली होती,
कारण ऑफिसमध्ये रोहित आज तिची आतुरतेने वाट बघत होता.. ऑफिसला पोहोचल्यावर ती सरळ
रोहितकडे गेली. तिला पाहून रोहितने लगेच हातातलं काम बाजूला ठेवलं आणि तिच्याशी
गप्पा मारायला लागला.. बोलत बोलत सहजच रोहितने नेहाचा हात हातात घेतला आणि तो
तिच्याकडे पाहून बोलू लागला, ‘आज आपण संध्याकाळी बाहेर जाऊ आणि मग थोडं फिरणं झालं
की, मी सोडतो तुला घरी..’ रोहितच्या ह्या बोलण्यावर नेहाने थोडं लाजत पण तितक्याच
प्रेमाने हो..! असं उत्तर दिलं.
संध्याकाळी ठरल्याप्रमाणे दोघंही फिरत
फिरत निघाले.. गप्पा मारत, एकमेकांच्या सहवासात त्यांचा वेळ कसा निघून गेला हे
त्यांना कळलंच नाही. उशीर झाला होता म्हणून रोहितच नेहाला घरी सोडणार होता. घराजवळ
आल्यावर नेहाला बाय म्हणत रोहित निघणार तोच नेहाने त्याला थांबवलं, त्याचा हात पकडत
ती बोलू लागली, ‘आजपर्यंत स्वतःच्या आनंदाचा मी कधीच एवढा विचार केला नव्हता, पण
तू मला हसायला शिकवलं, पुन्हा प्रेम करायला शिकवलं.., खरच कधी प्रेमात पडले तुझ्या
हे कळलंच नाही मला..! आणि तितक्यात रोहितने तिला घट्ट मिठी मारली..’
बराच वेळ गप्पा मारल्यावर रोहित घरी
गेला. तो तिच्या नजरेआड जाईपर्यंत ती तसच त्याला प्रेमाने बघत थांबली होती..
तितक्यात तिला मागून नेहा.. असा आवाज आला..
तिने मागे वळून पहिलं आणि तिला धक्काच
बसला.. कारण समोर शशांक उभा होता.. त्याला पाहून नेहा विचाराने सहा महिने मागे गेली.. तिला शेवटच्या पेपरचा
दिवस आठवला, तिने स्वतःला कसं सावरलं त्या दिवशी शशांक समोरून निघून जाताना, मग
तिने दिलेला इंटरव्ह्यु तिथे तिला रोहितच
भेटणं, मग त्याचं नेहाला सावरणं, मैत्री
ते प्रेम हा सगळा प्रवास नेहाच्या
डोळ्यासामोरून एका क्षणात गेला.
शशांकच्या आवाजाने नेहा भानावर आली; ‘तू
इथे काय करत आहेस..?’ गोंधळात पडलेल्या नेहाने शशांकला प्रश्न केला. त्यावर
त्याने, मला माहीत आहे तुला माझ्याशी बोलायचं नाहीये,काही ऐकायच नाहीये.. पण निदान
आपण मित्र म्हणून तर राहुच शकतो ना..? आणि त्यानंतर तुला वाटलं तर आपण पुन्हा
रिलेशनमध्ये येऊ..! पण प्लीज मला असं सोडू नकोस.. तू निघून गेल्यापासून मी रोज तिळ
तिळ तुटत आहे.. आणि आज नाहीच राहावलं
म्हणून आलो आहे मी इथे..’ एवढं बोलून तो थांबला..
शशांकच बोलणं ऐकून ती विचारात पडली; हा
तोच मुलगा आहे ना.. जो मी बोलले नाही तरी मला
बोलत नव्हता, मला साधं प्रेमाने विचारतही नव्हता आणि आज हा अचानक असं बोलत आहे..
स्वतःच्या विचारातून बाहेर पडत तिने शशांकला ठीक आहे.. आपण फक्त मित्र असू पण माझ्याकडून कसलीच अपेक्षा
ठेऊ नको.. कारण मी आता पुन्हा येणार नाहीये तुझ्याकडे.. असं बोलत ती थांबली.. हे ऐकून शशांक खुश होत म्हणाला, ते आपण नंतर ठरवू..! तु हो म्हणालीस मैत्री
करायला तर पुढे रिलेशनला पण नक्की हो म्हणशील..! कारण मी आता पुन्हा आधीसारख्या
चुका करणारच नाही.. एवढं बोलून तो निघून गेला..
नेहा मात्र विचारात पडली की, आता शशांक
कशाला परत आला.. काय हेतु असेल त्याचा आता..? विचार करत करत नेहा झोपी गेली. सकाळी
जाग आली तेच रोहितचा मेसेज तिला आला, त्याचा मेसेज वाचून थोडं लाजतच तिने आवरायला
सुरुवात केली. ऑफिसला पोहोचल्यावर नेहमीप्रमाणे रोहितला भेटून ती तिच्या कामांना
लागली. तितक्यात तिला शशांकचा मेसेज आला, ‘कशी आहेस..?’मेसेज पाहून विचारात पडतच
तिने शशांकला उत्तर दिलं ‘ठीक आहे..’ असच एक एक करत तो आता तिची चौकशी करू लागला..
तीन-चार दिवस झाले तसं शशांकचे हे मेसेज चालू होते.. आणि एक दिवस तिने स्वतःहून
शशांकला मेसेज केला; ‘आज संध्याकाळी भेटू..’ तिचा तो मेसेज पाहून शशांक एकदम खुश
झाला, त्याला वाटलं नेहा पुन्हा आपली झाली.. आता मी तिला पुन्हा कधीच जाऊ देणार
नाही.. असं विचार करत तो संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागला..
संध्याकाळी शशांक नेहाने बोलावलेल्या
जागेवर येऊन पोहोचला; तसा तो जरा लवकरच आला होता.. नेहा भेटणार म्हणून खुश होता तो
आज.. ठरलेल्या वेळेवर नेहा तिथे आली, शशांक तिला पाहून आनंदी झाला पण तोच त्याच्या
चेहऱ्यावर थोडं तणाव दिसू लागला कारण नेहा एकटी आली नव्हती, सोबत एक मुलगा होता
तिच्या.. नेहा येऊन बसली, तोच शशांकने
नेहाचा हात हातात घ्यायला हात पुढे केला, पण नेहाने हात मागे करत; हा रोहित..!
असं रोहितकडे बोट करत शशांकला त्याची ओळख करून दिली.. शशांकने रोहितकडे बघत
उगाच एक स्माइल दिली.. आणि तो नेहाशी बोलू लागला; ‘तू आज पुन्हा माझ्या आयुष्यात
आली, मला खरच खूप आनंद झालाय, मी आता कधीच असं वागणार नाही..,मला काही नकोय फक्त
तू हवी आहेस मला..! एवढं बोलून तो नेहाकडे पाहू लागला..
त्याचं बोलणं झाल्यावर नेहा म्हणाली, ‘
मी आज इथे तुला बोलावलं आहे कारण मला तुला काहीतरी सांगायचं आहे.., ‘मी तुझ्यावर
प्रेम केलं, पण तेव्हा तुला माझी किंमत नव्हती, आणि मी तुला सोडून गेल्यावर तुला
त्याची जाणीव झाली म्हणून तू आज परत आलास..!’ पण ह्या सगळ्यात ‘तू कुठेच हा विचार
केला नाही की, असं वागून तू मला किती
दुखावलं..! , आजही तू मला हेच म्हणत आहेस की; ‘मी आता पुन्हा कधीच असं
वागणार नाही, सोडून जाणार नाही..’ पण ‘शशांक..
मुळात हा प्रश्नच नाहीये..!’ तुला मी हवी आहे म्हणून तू आता माझ्याकडे
आलास; पण एकदा तरी तू मला विचारलस का, ‘मला तू हवा आहेस की नाही ते..?,
माझ्या मनात तुझ्याबद्दल अजूनही काही आहे का..?’
असं काहीच तू विचारलं नाही कारण तुला त्याने काही फरकच पडत नाही..
तुझं प्रेम तर आहे माझ्यावर पण त्या प्रेमात
माझा विचार कुठेच नाहीये.. आणि आता तू पुन्हा आलास म्हणून मी तुझ्याकडे परत यावं
अशी अपेक्षा तुझी आहे..! पण शशांक मला ते
आता शक्य नाही. कारण, ‘माझं तुझ्यावर नाही
तर माझं रोहितवर प्रेम आहे..!’ हे ऐकून शशांक नेहाकडे आणि रोहितकडे बघत म्हणाला,
असे किती दिवस झाले तू त्याला ओळखते, आणि असं काय केल ह्याने की तुला मी नकोय तो
हवाय..?
त्याच बोलणं ऐकून नेहा म्हणाली, ‘नात्याला
किती दिवस झाले ह्यापेक्षा त्या नात्यात आपलेपणा, काळजी, प्रेम किती आहे हे महत्वाचं
असत. आणि रोहितच म्हणशील तर; त्याने आजपर्यंत कधीच मला एकट सोडलं नाही, जेव्हा मला
आधाराची, कोणाच्यातरी मैत्रीची, प्रेमाची गरज होती तेव्हा फक्त तो होता
माझ्यासोबत.. त्याने कधीच फक्त स्वतःचा विचार केला नाही, त्याच्यासाठी मी नेहमी
महत्वाची असते. त्याला वेळ भेटत नसला
तरी तो वेळ काढतो माझ्यासाठी..!, आणि सर्वात महत्वाचं, ‘त्याची चूक असेल तर तो ती
मान्य करतो.. एकटं सोडून गेला नाही तो मला
आजपर्यंत कधीच तुझ्यासारखं..!’ आणि हेच
मी तुला आज सांगायला आले होते की, ‘माझी निवड रोहित आहे..!’ आणि आता कायम माझी
निवड रोहितच राहील.. एवढं बोलून नेहा आणि
रोहित निघाले.. त्यांना जाताना पाहून शशांकच्या डोळ्यातून
अश्रूंचा पूर वाहत होता.. शशांकला आज त्याने खरं काय गमावलं आहे ह्याची
जाणीव होत होती.., त्याच्या हातातून वेळ कधीच निघून गेलेली होती.
आता नेहाला फक्त जाताना बघणं हेच त्याच्या हातात होत..
ह्या कथेतून मला हेच सांगायचं आहे की,
नात्याला वेळ देणं, आपल्या लोकांशी वेळेवर काही गोष्टी बोलण हे किती महत्वाचं
आहे.. नात्यात दुर्लक्ष करत गेल्याने हाती फक्त दुरावाच येतो हे आपण समजून घेतलं
पाहिजे. आणि वेळ आहे तोपर्यंतच चुका सुधरवल्या पाहिजे , नाहीतर वेळ निघून गेल्यावर
त्या चुका सुधरवण्यात काही अर्थच राहत नाही.. त्याचबरोबर नात्यात दोघांच्या मताला
बरोबरीच महत्व दिल्या गेलं पाहिजे तरच ते नात चिरकाल टिकत, त्या नात्यातला गोडवा
टिकून राहतो.
- मराठी लेखणी
0 टिप्पण्या