अनुभव एक गुरु..






            काही गोष्टी ज्या शिकून कळत नसतात त्या अनुभवातून कळतात..  


अनुभव एक गुरु..

      लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत आपण अनेक गोष्टी शिकतो. त्यातल्या काही गोष्टी आपण तेवढ्या वेळेपूरत्या शिकून घेतो आणि नंतर काम झालं की आपण त्या विसरून जातो. असच, आयुष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातूनसुद्धा आपण खूप काही शिकत असतो. कधी एखाद्याचं मन जपायला शिकतो तर कधी माणसं ओळखायला शिकतो, कधी एखाद्या माणसाच्या मनातली गुपितं ओळखायला शिकतो तर कधी काही ठराविक व्यक्तींशी कसं वागावं हे शिकतो.

      वयाच्या प्रत्येक टप्यात येत जाणारे हे अनुभव खूप काही शिकवून तर जातातच पण त्याच बरोबर एक वेगळी, नवी वाट दाखवून जातात. आणि मग एकदा आलेला हा अनुभव कायम आपल्या सोबत राहतो परत त्याच चुका आपल्या हातातून होऊ नये ह्यासाठी..  

      आयुष्यात  काही अनुभव असे येतात, जे चांगला मार्ग दाखवतात तर काही अनुभव असेही येतात, जे वाईट मार्गावर आणून सोडतात. पण त्या वाईट अनुभवातून पुन्हा एक अनुभव हा मिळतोच. थोडक्यात काय तर, शिकून किंवा कोणाच ऐकून एखादी गोष्ट केली तरी फार काळासाठी त्याचा उपयोग हा होत नसतो. कारण, त्या शिकलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टीला अनुभवाची जोड ही लागतच असते.

      येणारे हे अनुभव कोणत्याही नात्यात येतात. कधी मैत्रीत ,कधी प्रेमात तर कधी व्यवहारात.. पण ह्याच अनुभवामुळे आपण पुढचं पाऊल हे विचार करून टाकतो. काही माणसांबद्दल वाईट अनुभव आले. तर नंतर नव्या माणसांशी मैत्री करताना आपण आलेल्या अनुभवातून नक्कीच विचार करून मग मैत्री करतो. आणि म्हणूनच तर अनुभव हा महत्वाचा असतो.

      काय आणि किती चांगलं हे समजून घेण्यासाठी अनुभव हा हवाच असतो. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला ओळखायचा असेल.  तर गरजेच हे कधीच नसत की, ती व्यक्ती आपल्यासोबत किती दिवस आहे; जोपर्यंत तसा प्रसंग किंवा तसा अनुभव येत नाही. तोपर्यंत त्या व्यक्तीचा स्वभाव हा आपल्याला कळतच नसतो. म्हणून अनुभव हा आयुष्यात सोबतीला हवाच.. अनुभव असेल तर आपण चुका कमी करतो. नव्या गोष्टी करताना मागच्या अनुभवातून आपण सावध होऊन पाऊल उचलतो.  पण येणारे हे अनुभव तेव्हाच उपयोगी पडतात जेव्हा त्यातून आपण काही शिकतो. त्या अनुभवांचा  सकारात्मक दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हाच ते आपल्याला आयुष्यात कामाला येतात.

 

            - मराठी लेखणी 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या