आयुष्य म्हणजे वेळेचं एक गणित..





        प्रत्येकाला असं नेहमी वाटत असत की, आपली कामं वेळेत झाली पाहिजे, किंवा आपण वेळेत काही गोष्टी केल्या पाहिजे..


आयुष्य म्हणजे वेळेचं एक गणित..

      वेळ किती महत्वाची असते हे आपण सगळेचं जाणतो. पण त्या वेळेचं खरं गणित ओळखायला आपल्याला बराच वेळ लागतो. कधी लवकर समजत पण कधी आयुष्य निघून जात तरी कळत नाही.

      तसं तर वेळ ही सगळ्याचं गोष्टीत महत्वाची भूमिका बजावत असते. पण ह्या वेळेचं खरं महत्व हे काहीतरी गमावल्या शिवाय येतच नाही. कारण जेव्हा गरज असते तेव्हा आपण निवांत राहतो. त्या गोष्टीचं गांभीर्य तेव्हा आपल्याला कळतच नसतं आणि मग जेव्हा ते कळतं. तेव्हा त्याचा काही उपयोग होत नसतो. आयुष्यात वेळेचं गणित हे ज्याचं त्यालाचं बसवता आलं पाहिजे. कोणी सांगून किंवा आपल्याला ते गणित आपल्या आयुष्यात बसवून देऊन काहीच फायदा नसतो. कारण, शेवटी आयुष्य आपलं असत. ते कसं आणि किती पुढे नेता येईल, कोणत्या मार्गाने, कधी नेता येईल हे आपल्याला जास्त कळतं असत. मग आपल्या आयुष्याचं गणित हे आपलं आपणच बसवायला हवं ना..!

      वेळेचं हे गणित आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग घेऊन येतं. कधी खूप त्रास देणारे तर कधी आनंद देणारे प्रसंग.. पण त्या प्रत्येक प्रसंगात हिंमतीने कसं उभं राहायचं हे वेळच शिकवते. वेळेनुसार आयुष्यातली नाती बदलतात, वेळेनुसार आयुष्यातली लोकं बदलतात. त्यांचं वागणं बदलत, नात्यातल्या अपेक्षा बदलतात, आयुष्यातल्या आपल्या गरजा बदलतात.. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या वेळेनुसार बदलत जातात. मग त्या गोष्टींचा कधी त्रास होतो तर कधी चांगलंही वाटत.  

      वेळेनुसार झालेला हा बदल आपण कसा स्वीकारतो ह्यावर त्याचा आपल्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो. होणारा बदल जर सकारात्मक भावनेने स्वीकारला तर पुढे चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता असते. पण तेच जर हा बदल नकारात्मक दृष्टीने स्वीकारला तर त्यात तोटा हा आपलाच होतो.

      आपण नेहमी म्हणतो, ‘आयुष्य खूप काही शिकवतं’. पण खरं तर, आयुष्यातली वेळं आपल्याला शिकवत असते. नवे अनुभव देते, आपला दृष्टिकोन बदलते, माणसांची किंमत दाखवते, तर कधी माणसांचं खरं रूप दाखवते. मग आपलं पूर्ण आयुष्य बदलणाऱ्या ह्या वेळेकडे; आपण दुर्लक्ष तरी कसं काय करतो..?, आपण अगदी सहज; बघू, करू, होईल अशी आपलाच घात करणारी उत्तर कशी काय देतो..?  तर  ते फक्त ह्यामुळे कारण, आपण वेळेनुसार प्रत्येक गोष्टीचं महत्व शिकत जातो. आणि जोपर्यंत तसे अनुभव येत नाही तोपर्यंत आपण त्या वेळेला स्वीकारत नाही.      

      म्हणूनच आपलं आयुष्य घडवणारी ही वेळं, आपल्या आयुष्यात खरंच किती महत्वाची आहे ह्याचा एकदा तरी आपण विचार केलाचं पाहिजे. वेळेनुसार काही कामांना, नात्यांना, आपल्या माणसांना वेळं दिला पाहिजे. वेळ आहे तोपर्यंतच काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. तेव्हाच  आपलं आयुष्य हे आपण ठरवलेल्या मतांवर चालत असत.   

 

            - मराठी लेखणी

 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या