विश्वास निव्वळ एक आभास..





विश्वास म्हणजे आपलेपणाची खूण. पण हाच विश्वास काही लोकांकडून अगदी सहज तोडल्या जातो..

विश्वास निव्वळ एक आभास..

      आयुष्याच्या प्रत्येक टप्यात आपल्याला सगळ्यांकडून काही ठरलेली  वाक्य नक्कीच ऐकायला भेटतात.. ती वाक्य म्हणजे ‘माझ्यावर विश्वास ठेव’., ‘मी असं वागणार नाही’, ‘मी असं करणार नाही’.. अशी बरीच वाक्य दरवेळी आपल्या कानावर पडतात. पण खरंच ह्या शब्दाला अर्थ आहे का काही..?, ह्या शब्दाच्या जोरावर किती तरी गोष्टी केल्या जातात, पण काही लोकांच्या लेखी ना त्या शब्दाला अर्थ असतो ना एखाद्याच्या भावनेला अर्थ असतो..

      आपल्याच जवळची अशी बरीच माणसं असतात.  जी नकळतपणे विश्वास ह्या एका शब्दाच्या नावावर आपल्याला फसवत असतात. आपल्या तोंडावर गोड बोलत आपल्याच विरोधात अनेक गोष्टी केल्या जातात. आणि आपण मात्र आपल्या जवळची व्यक्ती, विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहत असतो. पण त्यांनी मात्र विश्वासाची एक आभासी पट्टी आपल्या डोळ्यावर बांधलेली असते. आणि ती पट्टी इतकी घट्ट असते की, कोणी येऊन ती पट्टी काढायचा प्रयत्न जरी केला, तरी आपण ती पट्टी काढत नाही.

      खरं तर हे सगळं होत कारण, आपण माणसं ओळखण्यात चूक करतो. आणि बऱ्याचदा आपण आपल्या मनाशी असा गैरसमज करून घेतो की, आपण त्या माणसांना खूप चांगलं ओळखतो. पण तसं नसत. आपल्या समोर असणारी एखादी व्यक्ती ही आपल्या मागेसुद्धा तशीच असेल का ह्याचा विचारच आपण कधी करत नाही. आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती आपल्याला फसवत असते पण आपलं मात्र त्या फसवण्याकडे कधी लक्षच जात नसत. कारण, त्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवलेला असतो.

      जेव्हा ह्या गोष्टी आपल्या समोर येतात तेव्हा मग आपलं मन पूर्णपणे हादरून जात. आपल्याला काय करावं, कोणाशी बोलावं काही कळत नाही. म्हणूनच एखाद्यावर विश्वास ठेवताना, एखादी व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे हे बघताना; ‘ती व्यक्ती त्या विश्वासाला पात्र आहे का..?’, ‘आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, तर ती व्यक्ती तो विश्वास जपून ठेवेल का..?’ हे दोन प्रश्न जरी आपण आपल्या मनाला विचारले ना तर आपल्यासोबत होणारा विश्वासघात नक्कीच टळू शकतो. मग आता हे आपल्याला ठरवायचं आहे, की आपण एखाद्यावर ठेवलेला विश्वास हा निव्वळ आभास आहे की, खरंच विश्वास आहे.

 

            - मराठी लेखणी     




 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या