तिचं धाडस..





तिचं धाडस..    

 

            संध्याकाळचे सात वाजत आले होते. तरी मेघा अजून घरी आली नव्हती. सातपर्यंत ती नेहमी घरी येऊन जात असते असा विचार करत अक्षय दारात उभा होता. शेवटी वाट पाहून तो घरात येऊन बसला, मोबाईलमध्ये वेळ घालवावा असं म्हणत त्याने मोबाइल हातात घेतला. थोड्यावेळाने पुन्हा त्याला लक्षात आलं की, आठ वाजत आले तरी मेघा अजून आलेली नाहीये. आता मात्र त्याला काळजी वाटत होती. तिला फोन लावला तरी तिचा फोन बंद येत होता. आता तिच्या ऑफिसकडे जाण्याशिवाय दूसरा पर्याय त्याला दिसत नव्हता.  म्हणून तो गाडीची चावी घेत दार लावायला लागला तितक्यात त्याला समोरून मेघा येताना दिसली.. तिला पाहताच अक्षयचा जीव भांड्यात पडला.. ‘काय हे किती उशीर..?’, ‘तू वेळ होणार असला की आधी कॉल करत जा मेघा, काळजी वाटते..!’ अक्षयच्या ह्या बोलण्यावर मेघा फक्त, ‘हो..’ असं उत्तर देत सरळ घरात निघून गेली. मेघाचं हे वागणं पाहून अक्षय थोडा विचारात पडला. पण ती घरी आलीये म्हणून तो काही न बोलता घरात येऊन टीव्ही चालू करून बसला..

      जेवताना अक्षयला जाणवत होत की, मेघाच लक्ष नाहीये आज.. म्हणून जेवण झाल्यावर मेघाचा मूड ठीक करायचा म्हणून तो तिला बाहेर फिरून येऊ असा हट्ट करू लागला.. पण मेघाने झोपेच कारण देऊन बाहेर जाणं टाळलं. आता मात्र अक्षयला खात्री पटली होती की, मेघाचं नक्कीच काही तरी बिनसलं आहे.. पण काय हे मात्र त्याला कळत नव्हत..

      दुसऱ्यादिवशी सकाळी नाश्ता करताना त्याने मेघाला जवळ बसवत विचारलं, ‘मेघा नेमकं काय झालं आहे..?, इतकी शांत का आहेस तू..?’  अरे, कुठे काय काहीच तर नाही..!  किती काम पडली आहेत ना.. असं म्हणत हसत हसतच पुन्हा एकदा त्याचा प्रश्न मेघाने टाळला.. आणि उठून किचन मध्ये निघून गेली.. किचनमध्ये जाऊन मेघा डोळ्यातलं पाणी पुसत काल झालेल्या गोष्टीचा विचार करत होती.  तिचं मन तिला सांगत होत की, अक्षयला झालेलं सगळं सांगून द्यावं. पण तो समजून घेईल का..?, की त्याला सुद्धा माझीच चूक आहे असं वाटेल..? ह्या विचारात असताना अक्षयच्या आवाजाने ती दचकली.. संध्याकाळी येताना सोबत येऊ असं म्हणत अक्षय ऑफिसला निघून गेला.. मेघा मात्र आज ऑफिसला कसं जायचं ह्याच विचारात होती. शेवटी हिंमत करून ती गेली ऑफिसला..

            ऑफिसला गेल्यावर आज पुन्हा अनिकेत काही तरी करेल ही भीती मनात ठेवूनच ती ऑफिसमध्ये आली होती.. तिच्या जागेवर येऊन बसल्यावर मेघाला अचानक अनिकेतची आणि तिची ऑफिसमधली पहिली भेट आठवली. शांत, हुशार पण थोडा रागट स्वभावाचा अनिकेत कसा तिचा मित्र झाला हे सगळं तिला आठवू लागलं.. ‘पण मी तर कधी माझ्या मर्यादा ओलांडल्या नाहीत.., मित्र म्हणूनच कायम अनिकेतशी बोलत आले.’ मग तरी सुद्धा त्याला असं का वाटत असेल..?, आणि माझं लग्न झालेलं आहे हे माहीत असूनही तो असं का करत आहे..? अशा किती तरी प्रश्नाची उत्तर मेघा शोधत होती. तितक्यात समोरून अनिकेत आला. त्याच्याकडे लक्ष न देता तिने कामाला सुरुवात केली. पण अनिकेत मात्र काहीच विचार न करता सरळ तिच्या जवळ आला, ‘काल तर तू ऐकलं नाही गेलीच शेवटी घरी.. पण आज मात्र मी अक्षयलाच कॉल करणार आहे, आणि मग बघतो मी कसं राहतो तो तुझ्यासोबत..’ असं म्हणत तो जाऊ लागला. मेघा त्याला विनंती करत होती पण अनिकेत तिचं काहीच न ऐकता सरळ तिथून निघून गेला..

            आता मेघाला काय करावं काही कळत नव्हत, अनिकेतच्या त्रासाला मेघा कंटाळली तर होती.  पण इतके दिवस निदान तिला असं वाटायचं की, अनिकेतचं ऐकलं तर तो अक्षयला आपल्या बदल सांगणार नाही. पण आज तिला हे कळून चुकलं होत की, अनिकेत खूप मतलबी आणि स्वार्थासाठी काही करणारा माणूस आहे. मेघाला त्रास द्यायचा म्हणून अनिकेतने किती तरी वेळा कामानिमित्त तिला ऑफिसला थांबवून घेतलं होत. आणि अनिकेतच्याच  प्रोजेक्टमध्ये काम करत असल्यामुळे मेघालासुद्धा उशिरापर्यंत थांबाव लागतच होत. अशातच अनिकेतने मेघा आणि त्याच्यात काही तरी सुरू आहे अशी अफवा ऑफिसमध्ये पसरवली होती. तेव्हापासून अनिकेत  मेघाला माझं ऐकलं नाही तर अक्षयला पण असच सांगेल असं म्हणत धमकावत होता. आणि आता काही दिवसांपासून तो मेघाला सारखं घरी चल असं म्हणत तिच्या मागे लागला होता. पण मेघा त्याच ऐकत नाही म्हटल्यावर काल त्याने तिला जबरदस्ती ऑफिस मध्ये बंद करून ठेवलं होत. पण ऑफिसच्या मागच्या दाराने ती तिथून पळून आली होती. 

            पण आता अनिकेत अक्षयला काही तरी सांगणार आणि अक्षयने सुद्धा इतरांसारखा त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर..?  ही भीती मेघाला  वाटत होती.. संध्याकाळी घरी जायला निघाल्यावर पुन्हा तोच विषय तिच्या डोक्यात फिरत होता. ह्या विचारांच्या गोंधळात ती, अक्षय तिला घ्यायला येणार आहे हे पूर्णपणे विसरून गेली होती. घरी पोहोचल्यावर अक्षयने तिला कॉल केला, तेव्हा तिच्या लक्षात आलं की, आपण घरी पोहोचलो आणि अक्षय ऑफिस जवळ वाट पाहत असेल. कॉल उचलून मेघा काही बोलायच्या आत अक्षय तिला म्हणाला, ‘जशी आहे तशी आता तुझ्या ऑफिस जवळच्या कॅफेमध्ये ये..’ एवढं बोलून अक्षयने कॉल ठेवून दिला.

            आता मेघाला खूपच भीती वाटत होती. नक्कीच अनिकेतने अक्षयला काही तरी सांगितलं आहे. आणि म्हणूनच अक्षयने मला ऑफिस जवळ बोलावलं आहे. असं तिला वाटत होत.  सगळं संपलं.. अक्षय आता मला कायमच सोडून देणारं.., तो कधीच मला माफ करणार नाही. अशा भीतीत मेघा त्या कॅफेमध्ये पोहोचली. आणि तिथे गेल्यावर अनिकेतला अक्षयसोबत पाहून तर तिला खात्रीच पटली की, आता अक्षय काही आपलं ऐकत नाही. मेघा अक्षय जवळ जाऊन बसली. ती काही बोलणार तोच अनिकेत अक्षयला म्हणाला, ‘बघ.  कशी आली ती’, आपण दोघं इथे आहोत म्हटल्यावर, तिच सगळं खरं मी तुला सांगितलेलं असेलच. हे माहीत असूनसुद्धा ती इथे निर्लज्जसारखं आलीये. अनिकेतने होत नव्हत ते सगळं बोलून टाकलं मेघाबदल..  पण अक्षय एक शब्दसुद्धा मेघाला बोलला  नाही. आणि सरळ घरी निघून गेला. त्याला असं जाताना पाहून मेघाने त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण अक्षयने तिचं काहीच ऐकलं नाही. मेघा अक्षयच्या मागे जायला लागल्यावर अनिकेतने तिचा हात पकडला, तोच मेघाने अनिकेतला कानाखाली मारली..  ‘परत हात लावायचा नाही मला..!’ असं बोलत त्याला जोरात ढकलून दिलं. आणि होती नव्हती तेव्हढी सगळी ताकद  वापरून मेघाने अनिकेतविषयीचा  मनातला सगळा राग त्याला बोलून,मारून व्यक्त केला होता..

            आज पहिल्यांदा अनिकेत मेघाला  इतकं खंबीर आणि आक्रमक बघत होता. तिला असं पाहून अनिकेत पूर्णपणे घाबरला होता. आजूबाजूचे लोकंही आता अनिकेतकडे रागात बघत होते. त्यांचा आणि मेघाचा रुद्र अवतार पाहून अनिकेत तिथून निघायला लागला तोच अक्षय त्याच्या समोर येत म्हणाला, तुला काय वाटलं, ‘तुझं बोलण ऐकून रागात मी मेघाला सोडून निघून गेलो.’  मला वाटल तर,  तेव्हाच मी तुला माझ्या पद्धतीने समजावल असत.  पण मी तसं केलं असत तर मेघाला असच सहन करत राहण्याची सवय लागली असती. जी मला तिला लावायची नव्हती.  तिने तुझ्यासारख्या लोकाना घाबरून न राहता त्यांना चांगला धडा शिकवावा म्हणून मी मुदाम इथून निघालो होतो. पण मी गेलो नव्हतो इथेच होतो.. कारण, मला माहीत होत. मी असं केल तर, ‘मेघाला ते सहन होणार नाही आणि ती नक्कीच तू काही केलं तर तुला न घाबरत धडा शिकणार..! आणि तेच झालं.. अक्षयचं हे बोलण ऐकून अनिकेत खाली मान खालून तिथून निघून गेला. आणि मेघा अक्षयजवळ येत रडत त्याला सगळं सहन केल्याबदल, अक्षयला काहीच न सांगितल्याबदल माफी मागू लागली. अक्षयने तिची समजून काढत तिला जवळ घेतलं.आणि इथून पुढे कधीच कोणाला घाबरायचं नाही असं सांगून ते दोघे घरी गेले. घरी जाताना मेघा खूप समाधानी, हिंमतवान आणि आनंदी दिसत होती.. त्या दिवशीपासून मेघा कधीच घाबरली नाही. तिच्यासमोर चुकीच वागणाऱ्या  प्रत्येकासमोर ती आता हिंमतीने उभं राहत होती.

            ही कथा लिहिण्याचं एकमेव कारण म्हणजे, आपण जेवढं एखाद्या गोष्टीला घाबरतो तेवढा त्या गोष्टीचा अतिरेक होत असतो. आपण सहन करतो म्हणून आपण कमकुवत आहोत.  असा समोरच्या व्यक्तीचा गैरसमज होत असतो. म्हणूनच चुकीच्या गोष्टी सहन करण्यापेक्षा, त्या गोष्टींना विरोध केला पाहिजे तरच त्यातून आपली सुटका होत असते. हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे.

 

            - मराठी लेखणी 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या