माणसाचा स्वभाव आणि त्या स्वभावामुळे दुरावणारी आपली माणसं..



      हा लेख लिहिण्याचं कारण म्हणजे, आपण आपल्याच वाईट स्वभावामुळे आपल्या जवळची, हक्काची माणसं आपल्यापासून कायमची दूर करतो.

 

माणसाचा स्वभाव आणि त्या स्वभावामुळे दुरावणारी आपली माणसं.. 

           

        कधी कधी आपण एखादी गोष्ट एवढी मनाला लावून घेतो की, एका ठराविक वेळेनंतर त्या गोष्टीला काही अर्थच राहत नाही. आणि परत वेळ निघून गेल्यावर त्या विषयावर बोलायला समोरच्या व्यक्तीकडे पण काही राहत नाही. कारण, आपल्या मनाला लागलेली ती गोष्ट समोरच्या व्यक्तीने कधीच सोडून दिलेली असते. त्यात आपल्याला त्या व्यक्तीच्या बोलण्याचा त्रास झालाय हे आपण त्या व्यक्तीला जेव्हा वेळ आहे, तेव्हा न सांगता वेळ निघून गेल्यावर सांगतो. तेव्हा होत असं की, समोरची व्यक्ती त्या विषयाला कधीच मागे सोडून पुढे निघून गेलेली असते. पण आपण मात्र तिथेच अडकून पडलेलो राहतो.

       म्हणूनच, काही गोष्टी ह्या जेव्हाच्या तेव्हा बोललेल्या चांगल्या असतात. कारण, आपल्या आयुष्यात फक्त तेवढी एकच गोष्ट असते असं तर नसत. मग त्याच एका विषयावर अडून बसून आपण इतर चांगल्या गोष्टी का सोडायच्या..?

        आपण नेहमी एकाच गोष्टीवर अडून राहिल्याने समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागतो आणि मग नकळतपणे ती व्यक्ती आपल्यापासून लांब राहायला लागते. कारण, आपण काही गोष्टी तिथल्या तिथे सोडून न देता त्या तश्याच आपल्या जवळ घेऊन बसत असतो. आणि ह्याचा त्रास आपण स्वतःला तर करून घेतोच पण आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा त्या गोष्टीमुळे त्रास करून देतो.  

       मग आपल्या ह्या एका वाईट सवयीमुळे किंवा एका वाईट स्वभावामुळे आपल्या जवळच्या व्यक्ती जर आपल्यापासून दुरावत असतील, तर आपण आपला स्वभाव किंवा ती सवय बदलायला काय हरकत आहे..?   आणि आपल्याला जर हे कळत असेल की, ह्या एका सवयीमुळे आपण आपल्या माणसांपासून लांब जात आहोत, एकटे पडत आहोत तर आपण वेळीच स्वतःला बदलायला हवं. ज्या गोष्टीमुळे आपण स्वतः किंवा आपल्या जवळची लोकं त्रासात आहेत, ती गोष्टी आपण लगेच सोडून द्यायला हवी.  कारण, आपल्या ह्या चुकांमुळे एकदा आयुष्यातून निघून गेलेल्या व्यक्ती पुन्हा कधी परत येत नसतात. आणि जर आल्याच; तर त्या व्यक्ती आधीसारख्या मनमोकळेपणाने आपल्या सोबत राहतीलच असं नसत. म्हणून, आपलाच घात करणाऱ्या आपल्या काही वाईट सवयी किंवा आपल्या स्वभावातल्या काही वाईट गोष्टी आपण वेळीच बदलायला हव्यात.

 

            - मराठी लेखणी 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या